कोल्हापूर शहरात गेल्या पंधरा दिवसात सापडलेल्या कोरोना पॉजिटीव्ह रुग्णांचे निरीक्षण केल्यास शहरामध्ये कोरोनाचा विळखा घट्ट होताना दिसत असून सामूहिक संसर्ग सुरु होण्याची स्थिती निर्माण होऊ शकते अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. प्रवासाचा कोणताही इतिहास नसणाऱ्या व कोणत्याही बाधीत रुग्णांच्या संपर्कात नसलेल्या व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सुरवातीला काही उपनगरात कोरोनाचे रुग्ण सापडू लागले होते, पण आता शहराच्या मध्यवर्ती प्रमुख भागामध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचे दिसून येत आहे. परवा जिल्ह्यातील एका आमदारपुत्रांना कोरोनाची लागण झाल्याची घटना ताजी असतानाच जिल्हा परिषद कार्यालयातील कर्मचारी, शहरातील खाजगी बँकेतील कर्मचारी तसेच नामांकित डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने तारांबळ उडाली आहे.

शहर पहिल्या टप्प्यातून दुसऱ्या टप्प्याकडे

कोल्हापूर शहरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होत आहे. उपनगरांसह मध्यवर्ती भागांतही कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. शहर पहिल्या टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात गेल्याची भीती व्यक्त होत आहे. सध्या कोणताही रुग्ण आढळून आल्यास प्रशासनाकडून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम हाती घेण्यात येत आहे, पण संक्रमणाचा आकडा वाढल्यास हे काम कठीण होऊ शकते व यामुळे शहराची तिसऱ्या टप्प्याकडे वाटचाल सुरु होईल. तिसऱ्या टप्प्यात गेल्यास समूह संसर्ग होतो.

असे असतात कोरोनाचे टप्पे

पहिला टप्पा: परदेशातून कोरोनाबाधित व्यक्ती देशात येणे, हा कोरोनाचा पहिला टप्पा. विमानतळावर परदेशी प्रवाशांची तपासणी न झाल्याने या प्रवाशांमुळे अनेक नागरिक बाधित झाले.
दुसरा टप्पा: या टप्प्यात बाधित व्यक्तीकडून स्थानिक संपर्कातील व्यक्तीला बाधा होते व त्याचा पुढे प्रसार होऊन संक्रमण वाढते. शहरातील नागरिक सध्या या टप्प्याला सामोरे जात आहेत.
तिसरा टप्पा : तिसऱ्या टप्प्यात स्थानिक बाधित व्यक्तीकडून समूहात विषाणूचा फैलाव होतो. या टप्प्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम कठीण होते. पुरेशी काळजी घेतली नाही तर शहर लवकरच या टप्प्यात जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
चौथा टप्पा : चौथ्या टप्प्यात बाधित समूहाकडून पूर्ण प्रदेशात उद्रेक होतो. हा टप्पा सर्वात गंभीर मानला जातो.

सार्वजनिक कार्यक्रम घेण्याचे टाळा. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका

शासनाच्या अनलॉक धोरणानुसार अनेक व्यवसाय टप्प्याटप्प्याने सुरु होत आहेत. सर्व प्रमुख बाजारपेठा सुरु झाल्याने ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. त्यातच मंगल कार्यालये व आता हॉटेल्स सुरु झाल्याने अनेक ठिकाणी लग्न, साखरपुडा तसेच इतर सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. असे सर्व कार्यक्रम घेण्याचे टाळावे अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे तसेच पूर्ण खबरदारी घेऊनच घराबाहेर पडावे अशी सूचना वारंवार करण्यात येत आहे. यापुढे सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याबाबत आणि कोणत्याही परिस्थितीत या विषाणूचा प्रादूर्भाव वाढू नये, यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे. मास्क वापरणे, वारंवार हात स्वच्छ धुणे, सॅनिटायजर वापरणे, परिसर निर्जंतुकीकरण करुन घेणे, कोणतीही लक्षणे आढळ्यास त्वरित आरोग्य विभागाशी सपंर्क साधणे याबाबत नागरिकांना आणखी दक्ष रहावे लागणार आहे. अन्यथा प्रशासनाकडून पुन्हा लॉकडाऊन सारखा निर्णय घेतल्यास नवल वाटायला नको.