गतवर्षीच्या न भुतो न भविष्यती अशा महापुरात तयार झालेल्या बऱ्याचशा गणेश मूर्ती डोळ्यांदेखत पाण्यात बुडाल्या . या संकटावर मात करीत मुर्ती कारागीरांनी आपले कसब पणाला लावून श्री गणरायाच्या उत्साही सणाला असणारे धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि घरगुती स्थापनेसाठी गणेश मूर्ती युद्ध पातळीवर तयार करून सर्वांनाच अचंबित केले होते….

गतवर्षीच्या अनुभवामुळे बऱ्याच मुर्ती कारागीर बांधवांनी यावर्षी लवकरच गणेशमुर्ती बनविण्यासाठी सुरवात केली, पण कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करत असताना त्यालाही काही मर्यादा आल्या पण मुर्ती बनविण्याचा उत्साह काही कमी नाही झालेला. त्यात मुर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची भाववाढ हा तर दरवर्षीचाच अनुभव…..

बालचमुंच्या आवडत्या आणि युवकांच्या कलागुणांना वाव देणारा गणेशोत्सव यावर्षी गतवर्षी पेक्षा दहा दिवस लवकर आहे त्यामुळे गतवर्षी सारखी तारांबळ उडू नये यासाठी सर्वांच्या लाडक्या बुध्दी देवतेचे वेगवेगळ्या स्वरूपातील रूप आपल्या कलागुणातून साकारण्यासाठी कुंभार बांधवांची धावपळ सुरू आहे……

रमेश तौंदकर
#amhi_kolhapuri