७५ वर्ष झाली कोल्हापूरकरांना अखंड ऊर्जा व प्रेरणा देणारा स्वातंत्र्य लढ्याचा अभिमान छत्रपती शिवरायांचा पुतळा…

कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणजे तमाम कोल्हापूर वासियांचे अखंड स्फूर्तिस्थान व ऊर्जास्त्रोत म्हणावे लागेल. अनेक घटना अनेक घडामोडी आंदोलने चळवळी याचा साक्षीदार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि या चौकामध्ये उभा असलेला छत्रपती शिवरायांचा हा पुतळा. जणू कोल्हापुरातल्या प्रत्येकाला एक अखंड उर्जा व प्रेरणा देत उभा असलेला हा पुतळा आहे. सध्याच्या या पुतळ्याच्या ठिकाणी १९२८ चाली ब्रिटिश राजवटीमध्ये गव्हर्नर विल्सन चा पुतळा बसविण्यात आला होता.

हा पुतळा क्रांतिकारकांच्या नजरेत खुपत होता. पण ब्रिटिश राजवट असल्यामुळे काहीच करता येत नव्हते. १९४२ साली देशभर महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली चलेजाव चळवळ सुरू झाली. कोल्हापूर संस्थान असूनही इथे या चळवळीने जोर धरला. प्रतिसरकार मधील नेते व कार्यकर्त्यांचा वावर कोल्हापुरात होता त्यामुळे क्रांतिकारकांनी विल्सन चा पुतळा विद्रूप करण्याचा निर्णय घेतला त्याची जबाबदारी भागीरथीबाई तांबट आणि जयादेवी हजारे यांनी उचलली.१० ऑक्टोम्बर १९४२ ला भर दुपारी डांबराची लोटकी त्यांनी विल्सनच्या पुतळ्यावर फेकून तो पुतळा विद्रूप केला.

पुतळा विद्रुप करून ब्रिटिश सत्तेविरोधातला असंतोषाच जणू या दोन रणरागिनींनी व्यक्त केला होता. या दोघींना पोलिसांनी पकडून त्यांच्यावर खटला भरला त्यांना १६ महिने सक्तमजुरीची शिक्षाही झाली. त्यावेळी भगिरथीबाई तांबट या गरोदर होत्या त्या बिंदू चौक कारागृहात शिक्षा भोगत असतानाच प्रसूत झाल्या. लोक पुतळ्याकडे पाहून हसू लागल्यावर तो झाकून ठेवला. पण स्वातंत्र्य सैनिकांना तो पुतळाच तिथून हटवायचा होता. त्यानंतर माजी खासदार शंकरराव माने यांच्या नेतृत्वाखाली पुतळा पुन्हा फोडण्याचे नियोजन झाले. १३ सप्टेंबर १९४३ रोजी पहाटे चार वाजता माजी आमदार काका देसाई, शंकरराव माने, शामराव लहू पाटील यांनी हातात खराटा बादली घेऊन पुतळा स्वच्छ करण्यासाठी जात असल्याचे भासवत ते पुतळ्याजवळ आले. देसाई रिव्हॉल्वर घेऊन रस्त्यावर थांबले. वडणगेचे नारायण घोरपडे आणि त्यांचा एक सहकारी पोलीस वेशात माळकर तिकटी येथे पहारा देत उभे होते.

शामराव पाटील यांनी शिडीवरून पुतळ्याजवळ चढून विल्सनच्या पुतळ्यावर हातोड्याने घणाघात करत करून डोके , कान , नाक , चेहरा छिन्नविच्छिन्न करून हात तोडून पुतळा पूर्णपणे विद्रूप केला. काका देसाई , शंकरराव माने , शामराव लहू पाटील, नारायणराव घोरपडे, नारायणराव जगताप, पांडुरंग जगताप, महादेव भाऊ घाटगे, पांडुरंग पोवार, आबु जाधव, अहमद शाबाजी मुल्ला,व्यंकटेश उर्फ बाबुराव देशपांडे ( सांगावं ), डॉ माधवराव कुलकर्णी, वसंत बळवंत तावडे, पै.माधवराव घाटगे, कुंडल देसाई, यांनी सर्वांनी ही मोहीम।फत्ते केली. काम पूर्ण झाले असे समजतात सर्वजण तिथून निघून गेले आणि बरेच दिवस भूमिगत राहिले. पुतळ्याची अशाप्रकारे विटंबना झाल्यावर तिथून तो हलवण्यात आला आणि मग त्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची कल्पना चित्रतपस्वी भालजी पेंढारकरांनी मांडली.

कोल्हापुरातील तत्कालीन प्रतिनिधी कर्नल हॅरिसनशी चर्चा केल्यानंतर त्यांनी पुतळा उभारण्या करता तोंडी परवानगी दिली. १३ मे १९४५ रोजी पुतळा उभारण्याची घोषणाही झाली भालजींनी लवकरात लवकर पुतळा उभारण्याची विनंती कलमहर्षी बाबूराव पेंटर यांना केली. त्यांनी त्यावेळी अवघ्या 18 दिवसात पुतळा तयार केला. म्यानातून तलवार काढून युद्धासाठी सज्ज असलेला तलवार उचलून उंचावणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा साकारण्यासाठी पेंटर यांना त्यांचा मुलगा रवींद्र मेस्त्री यांचीदेखील खूप मोलाची मदत झाली.

मदनमोहन लोहिया यांनी शुगर मिल मधून कास्टिंग आणि शेवटचे फिनिशिंग करण्यासाठी सहकार्य केले. पुतळा १३ मे रोजी बसविण्यात येणार असल्याची घोषणा झाल्याने नागरिकांनी चौकात मोठी गर्दी केली होती. पण पुतळा जागेवर नसल्याने नागरिकांचा धीर सुटू लागला. पण कलमहर्षी बाबूराव पेंटर यांनी युद्धपातळीवर फिनिशिंग करून शुगर मिल वरून पुतळा चौकात आणला. १३ मे १९४५ या दिवशी सायंकाळी साडेसहा वाजता पंतप्रधान माधवराव बागवे यांच्या हस्ते क्षात्र जगद्गुरु महाराज, शेठ माणिकलाल चुनीलाल व महसूलमंत्री भास्करराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा झाला. यावेळी शिवस्मारक समितीचे अध्यक्ष व्ही. टी पाटील सर, कलामहर्षी बाबुराव पेंटर, चित्रतपस्वी भालजी पेंढारकर, श्रीमंत बाबाराजे खर्डेकर, माधवराव बागल, जे. पी. नाईक आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर देखील उपस्थित होते. बालवीर यांचा बँड, पोलीस व इतर लवाजमा कार्यक्रम स्थळी होता.

स्वराज्याचा भगवा ध्वज फडकावून कार्यक्रम सुरू झाला. स्मारकाचे उद्घाटन होतात उपस्थित हजारो लोकांनी फुलांची उधळण करीत छत्रपती शिवरायांचा जयघोष करीत पेढे व मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला. हजारो कोल्हापूरवासीयांच्या, नागरिकांच्या उपस्थितीत तो छत्रपती शिवरायांचा पुतळा मोठ्या दिमाखात त्या चबूतर्यावर उभा करण्यात आला. १३ मे १९४५ रोजी प्रतिष्ठापीत केलेला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज या गोष्टीला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. कोल्हापूरच्या राजकीय आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांना तसेच तमाम कोल्हापूरकरांना गेली ७५ वर्ष झाली एक वेगळीच ऊर्जा देणारा छत्रपती शिवरायांचा हा पुतळा जणू काही स्वातंत्र्य लढ्याचा अभिमानच.

हा पुतळा कोल्हापूरच्या मध्यभागी असलेल्या चौकात उभा करण्यासाठी प्रयत्न करणारे तसेच विल्सन चा पुतळा येथून हटवण्यासाठी आंदोलन करणारे या पुतळ्याच्या उभारणीत योगदान देणारे तमाम नागरिक व आंदोलनकर्ते यांच्या कठोर धैर्याला, धाडसाला, शौर्याला व परिश्रमाला मनापासून वंदन.
छत्रपती शिवरायांच्या चरणी शिवशक्ती प्रतिष्ठान परिवार व आम्ही कोल्हापुरी फेसबुक ग्रुप च्या वतीने मानाचा मुजरा..

साताप्पा स. कडव
शिवशक्ती प्रतिष्ठान परिवार