(फोटो सौ. गुगल)

कोल्हापूर जिल्ह्याचे राधानगरीच्या पुढे पश्चिमेकडचे शेवटचे टोक आणि तेथून कोकणला जाऊन भिडणारी फोंड्याची खिंड या दरम्यानचा परिसर म्हणजे दाजीपूर .
दाजीपूर म्हणजे फोंडा घाटाची सुरवात . दाजीपूर म्हणजे तुफान पाऊस. दाजीपूर म्हणजे घनदाट जंगल . अशी जरूर ओळख ; पण दाजीपूरची खरी ओळख आजही लपलेली आहे . ” दाजीपूर ‘ हे नाव म्हणजे दाजीराव अमृतराव विचारे या संस्थानकालीन कर्तृत्ववान बांधकाम अधिकाऱ्याची स्मृती आहे . राजर्षी शाहू महाराजांच्या खास विश्वासातले जे चार – पाच अधिकारी होते, त्यापैकी एक दाजीराव विचारे होते . आज अभयारण्यामुळे दाजीपूर हे नाव सर्वांना माहिती आहे . पण दाजीराव विचारे यांची ओळख फक्त इतिहासालाच आहे .
दाजीपूरची चर्चा सर्व स्तरावर आहे . या पार्श्वभूमीवर दाजीपूर म्हणजे नेमके काय या स्मृतींनाही उजाळा मिळाला आहे.

आता जो दाजीपूरचा परिसर आहे , तो ओलवण या ग्रामपंचायतीचाच मूळ भाग आहे . किंबहुना दाजीपूर जंगलही ओलवणच्याच हद्दीत आहे . दाजीराव विचारे हे नाव त्यांच्या कर्तृत्वामुळे या परिसराशी जोडले गेले आहे . दाजीराव विचारे हे मुंबई सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरीस होते . ती नोकरी सोडून शाहू महाराजांनी त्यांना करवीर संस्थानच्या नोकरीत घेतले . ब्रिटिश अभियंता आर. जे. शानन यांच्या नंतर त्यांच्या जागी कार्यकारी अभियंता म्हणून दाजीराव विचारे यांची नियुक्ती झाली. ते बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ होते . राधानगरी धरण, साठमारी , खासबाग कुस्ती मैदान, पॅलेस थिएटर, सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवमंडप उभारणीत दाजीराव विचारे यांचे मोठे योगदान राहिले . बहुजन समाजातील मुलांनी शिकून मोठे व्हावे म्हणून होतकरू मुलांना त्यांनी दत्तक घेतले होते . त्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी स्वतःचा पैसा खर्च केला .

दाजीराव विचारे ,शाहूपुरीतील पाच बंगल्यापैकी एका बंगल्यात राहत होते. त्याकाळी हे पाच बंगले म्हणजे शान आणि मानाचे स्थान होते . आता त्यातल्या चार बंगल्यांच्या जागी मोठ्या अपार्टमेंट उभ्या आहेत. फक्त दाजीराव विचारे यांचा बंगला शिल्लक आहे .

या विचारेंनी एस . टी . स्टॅंडजवळ आता जे जेम्स स्टोन आहे , ती जागा शाळेसाठी नगरपालिकेला दान केली . विचारे विद्यालय म्हणून तेथे शाळा होती . काळाच्या ओघात ही शाळा पाडली . शाळेच्या मैदानावर बीओटी तत्त्वावर जेम्स स्टोन हे व्यापारी संकुल उभे राहिले . ज्यांनी जागा दान केली , त्यांचे नाव या संकुलाखाली गाडले गेले .
स्वच्छता मोहिमेच्या निमित्ताने शाहू महाराजांनी 1909 च्या सुमारास त्यांच्या कर्तृत्वाला मान म्हणून ओलवण गावाच्या परिसराला दाजीपूर हे नाव दिले . हेच नाव पुढे अभयारण्याला मिळाले . त्यामुळे दाजीपूर हे नाव जरूर सर्वतोमुखी झाले ; पण दाजी म्हणजे कोण हेच काळाच्या ओघात दडले गेले . आता स्वच्छता मोहिमेच्या निमित्ताने या परिसरातील कचरा तर दूर होईलच ; पण विस्मृतीत गेलेले दाजीराव विचारे पुन्हा नव्या पिढीसमोर येतील .