महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने नि कार्याने भाई माधवराव बागल चांगलेच प्रभावित झाले होते. फुले आंबेडकरांपासून तरुणांना या शाहू नगरीत सतत स्फूर्ती मिळाली पाहिजे हा भाईजींचा ध्यास होता. यासाठी त्यांनी बिंदू चौकात म फुले आणि डॉ आंबेडकर यांचे ब्राँझचे पुतळे करून घेतले आणि दि. ९ डिसेंबर १९५० रोजी हजारो लोकांसमोर अनावरण केले. या समारंभाचे वैशिष्टय़ म्हणजे पुतळे अनावरणसाठी कोणाही बड्या पाहुण्यास आणण्यात आले नव्हते भाई म्हणाले, “करवीर जनतेच्या हस्तेच हा अनावरणाचा कार्यक्रम होईल” बिंदू चौकाच्या डाव्या-उजव्या बाजूच्या लोकातून भाईजींनी दोन सामान्य माणसांना हाताला धरून नेले नि त्यांच्या हस्ते या पुतळ्यांचे अनावरण केले. खर्या अर्थाने जनतेच्या हस्ते होणारा असा हा समारंभ विरळा.

आज देशात सर्वाधिक पुतळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत गिनीज बुकात तशी नोंद आहे. परंतु कोल्हापूरचा यात विक्रम आहे. ७० वर्षापुर्वी भारतात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला पुतळा त्यांच्या हयातीत शाहू महाराजांच्या नगरीत बसवून क्रांती केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर १९५२ साली राजाराम महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनासाठी कोल्हापूरला आले होते. तेंव्हा त्यांनी स्वतः हा पुतळा पाहिला.
भारतीय घटनेचे शिल्पकार , भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन…
संदर्भ :- जुनं कोल्हापूर
लेखक :- माजी आमदार बाबूराव धारवाडे