आज सकाळी २ परदेशी पाहुणे दारात कुचबुज करीत उभे होते. बहुदा त्यांना काहीतरी हवं आहे असे वाटले म्हणून मी त्यांना जवळ जाऊन विचारतो तोवर त्यांनी हातातील मोबाईल दाखवला तर त्यावर ते लक्ष्मी मिसळ शोधत होते. २ सेकंद मनात एक म्हण आठवली “काखेत कळसा आणि गावाला वळसा”. मी त्यांना हेच ते म्हणून आत आणले. बर हेच ते म्हणण्यापर्यंतचा प्रवास सुखकर होता…

टू मिसल & टू टी अशी त्यांनी ऑर्डर दिली तोवर देखील हा प्रवास सुखाचा सुरू होता. त्यानंतर त्यांना धड पातळभाजी समजेना की धड पाव कारण दोघेही जापनीज त्यांना इंग्लिश समजत नाही म्हंटल्यावर डोकं काम करेना. त्यांना पोटभर खायला घालायचे हाच विचार डोक्यात होता पण त्यासाठी संभाषण घडणे गरजेचे होते मग काढलं आमचं वज्रअस्त्र म्हणजे मोबाईल ओ. गूगल वर इंग्लिश भाषा जापनीजमध्ये ट्रान्सलेट करून मग पुन्हा सुरू झाला जापनीजमय प्रवास…

SHINICHI आणि NATSUKO हे दोन जापनीज मिसळ खाऊन आज मिसळमय झाले. दोघांनी मिसळचे तसेच हॉटेलचे तसेच आमचे ढीगभर फोटो काढून मार्गस्थ झाले. हे दोन जापनीज २ दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत…

एरव्ही तुमच्यापैकी बरीचशी मंडळी सेलिब्रिटीना घेऊन येतात तसेच परदेशी पाहुण्यांना देखील घेऊन येतात पण आज चक्क जापनीज माणसं मिसळ शोधत आलीत म्हंटल्यावर नक्कीच ख्याती सातासमुद्रापार पोहोचली आहे म्हणायला वावगं ठरणार नाही…