
इरफान खान यांचे आज मुंबईतील रूग्णालयात निधन झाले, तेथे त्यांना कोलन संसर्गामुळे दाखल करण्यात आले. ५३ वर्षीय अभिनेता २०१८ पासून कर्करोगाशी झुंज देत होता आणि त्याच्या अधिकृत प्रवक्त्याने मंगळवारी डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असल्याची पुष्टी केली. इरफान यांच्या पश्चात पत्नी सुतपा आणि बाबेल आणि अयान हे पुत्र आहेत. चित्रपट निर्माते शुजित सिरकर यांनी अभिनेत्याची आठवण करून दिली.
प्रिय इरफान,
चंदेरी दुनियेत वावरताना लखलखत्या प्रकाशात तुझे डोळे कधी दिपून गेले नाहीत.उलट त्याच तुझ्या डोळ्यांनी अख्खी चंदेरी दुनिया तु सहज काबीज केलीस. अभिनयाची गुणवत्ता वाढता वाढता अभिनेत्यापेक्षा तुझ्यातला माणूस बहरत गेला.नव्या कलाकाराला उमेद देतानाच प्रेक्षकांतही सहज मिसळलास.एका नाटकाच्या शो ला उशीरा आल्यावर इतरांना डिस्टर्ब होऊ नये म्हणून भिंतीला टेकून उभा राहून आस्वाद घेणारा तू. इतकी नम्रता,सहजता,स्वाभाविकता,औदार्य हे अशक्य वाटणार सारं तुला मात्र सहज शक्य झालं. अभिनयासाठी गोंडस चेहरा लागतो हा सिध्दांत सहज खोडून तु अंगभूत कौशल्याने कॅमेरासमोर सहज नैसर्गिकरीत्या वावरत राहिलास.कुणाची कॉपी न करता ‘इरफान की सादगी ही उनकी स्टाईल है’! हे तू जगाला मान्य करायला भाग पाडलंस. हाॅलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता टाॅम हॅक्स एकदा म्हणाला होता, #इरफान की आंखे भी अभिनय करती है” ते काही उगाच नाही.

बॉलिवूड हॉलिवूड असा प्रवास करताना प्रादेशिक चित्रपटांची तळी सुद्धा तू उचलून धरलीस.भारताचं आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करताना मराठीचं चित्रपटांचं कौतुक करायलाही तु विसरला नाहीस. मग सैराटचं स्क्रीनिंग असो किंवा नटसम्राट, विहीर,देऊळ या चित्रपटांची तोंडभरून स्तुती असो. “सैराटची भाषा ही जागतिक भाषा आहे” असं म्हणालास तेव्हा कित्येकांच्या भुवया उंचावल्या असतील.कारण स्क्रीप्टमधील भाषिक सौंदर्य चित्रपट किती उंचीवर नेऊ शकते हे समजायला तुझ्यासारख्या निष्णात कलावंताची दृष्टी प्रत्येकाजवळ असतेच असे नाही.त्यामुळे प्रादेशिक चित्रपट जागतिक पातळीवर पोहोचवण्यात तुझा असलेला वाटा हा सगळ्यांना मान्यच करावा लागेल.
दुर्धर आजारावर मात करून तू पुन्हा परतशील असे वाटले होते, पण तुझा प्रवास लवकर आटोपला.मरण समोर असताना सतत आईची आठवण करत “पत्नीसाठी मला जगायचंय”असं म्हणणारा पडद्यामागचा कुटुंबवत्सल इरफान आज जगाने पाहिला.#डेथ और शीट किसी को, कहा भी, कभी भी आ सकती है! हे ‘लाईफ ऑफ मॅन’ चे वास्तव तुला सहज उमगलं. तुझ्या चित्रपटांतील केवळ काही डायलॉग जरी ऐकले तरी जिंदगीची असली पहचान प्रत्येकाला होऊन जाईल.खरंतर तुला मरण समजलं होतं.त्याला थोपवण्यासाठी तु संघर्षही केलास.हरला नाहीस लढत राहिलास.#I Will struggle असे म्हणत राहिलास.पण मर्यादा ध्यानात आल्यावर मरणावरच स्वार झालास.तुझ्या शेवटच्या संदेशात तु मनातलं सारं उलगडलंस.
तुझ्या डोळ्यातील चमक आणि अभिनयातील सहजता आज अजरामर झाली आहे.आईच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी तुझं जाणं हे तुझ्या चाहत्यांसाठी काळीज चिरणारं आहे.अभिनय आणि वास्तव जगणं यातील अंतर पुसणारा तु. कलाकार आणि प्रेक्षकांनाही खूप काही शिकवून गेलास. आभाळाला हात टेकल्यावर मातीवर पाय राहू शकतात हे तु जगाला दाखवून दिलंस.आज सारं जग पडद्यामागे असताना तु मात्र पडद्यावरुन कायमचा निरोप घेतलास.
सिर्फ इन्सान गलत नही होते, वक्त भी गलत हो सकता है
दि ग्रेट इरफान !

You must be logged in to post a comment.