पंचगंगा स्मशानभूमीला येऊन मिळणारे दोन्ही मार्ग पोलिसांनी रोखलेले. स्मशानभूमीच्या शेडलाही पत्रे माणरलेले. स्मशानभूमीत फक्त पाच कर्मचारी व त्यांच्यासमोर प्लास्टिकच्या आवरणात बांधलेला कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह. सोबत कोणी नातेवाईक नाहीत, हार नाही, फूल नाही, हुंदका नाही अशा वातावरणात या कोरोना बाधित रुग्णावर आज रात्री अकरा वाजता पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानभूमीतील पाच कर्मचाऱ्यांनी मृतदेहाला नमस्कार करून अग्नी दिला आणि कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाला अखेरचा निरोप दिला.

कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या रुग्णावर आज रात्री पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. संसर्गापासून खबरदारी म्हणून स्मशानभूमीतील पाचही कर्मचाऱ्यांनी पी पी किट घातले होते. महापालिकेच्या शववाहिकेतून हा मृतदेह आणला. संसर्ग टाळण्यासाठी शववाहिकाच्या चालकालाही खाली उतरून देण्यात आले नाही. पीपी किट घालून पूर्ण खबरदारी घेतलेल्या स्मशानातील कर्मचाऱ्यांनी मृतदेह चितेवर ठेवला. मृताचे नातेवाईक सोबत नसल्याने आपलाच एक बांधव या भावनेने कर्मचाऱ्यांनी नमस्कार करून अखेरचा निरोप दिला. एरवी स्मशानभूमीत शांतता असतेच, पण आज या मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना इतकी खबरदारी घेण्यात आली होती की स्मशान शांततेचा एक वेगळाच अनुभव या साऱ्या परिसराने घेतला. कोरोना संसर्ग किती घातक आहे. मृत्यूनंतरही कसे विरान अनुभवावे लागते, हे आज पंचगंगा स्मशानभूमीत कोरोना रुग्णावर झालेल्या अंत्यसंस्काराच्या निमित्ताने दिसून आले.